येरवड्यातून थेट निवडणूक रणांगणात उतरण्याचा प्रयत्न; गुंड बंडू आंदेकरचा PMC उमेदवारी अर्ज अपूर्ण ठरून नाकारला

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड आणि आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याने पुणे महानगरपालिका (PMC) निवडणुकीसाठी २७ डिसेंबर २०२५ रोजी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याचा उमेदवारी अर्ज अपूर्ण ठरवत नाकारला आहे.

सध्या बंडू आंदेकर हा आपल्या नातू आयुष कोमकर यांच्या हत्या प्रकरणात येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. विशेष मकोका (MCOCA) न्यायालयाने त्याला पोलीस बंदोबस्तात निवडणूक अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात त्याला आणण्यात आले.

या वेळी बंडू आंदेकरसोबत त्याची मेव्हणी लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर उपस्थित होत्या. मात्र, अर्जामधील काही महत्त्वाची माहिती आणि कागदपत्रे अपूर्ण असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. संबंधित उमेदवारांना ३० डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज पुन्हा दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे.

अर्ज भरण्यासाठी आणताना बंडू आंदेकरच्या चेहऱ्यावर काळे कापड बांधण्यात आले होते तसेच त्याचे हात दोरीने बांधलेले होते. कडक पोलीस बंदोबस्तात असतानाही त्याने आपल्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

उल्लेखनीय बाब म्हणजे बंडू आंदेकरवर यापूर्वी हत्या, खंडणी, टोळीयुद्ध यांसारख्या गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आपल्या मुलगा वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून त्याने नातू आयुष कोमकरची हत्या केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर असून हा खटला सध्या न्यायप्रविष्ट आहे. अशा पार्श्वभूमीवर त्याचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button