
पुणे दि 28 : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ साठी प्रत्यक्ष मतदान दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर २०२५ असून, यंदा प्रथमच उमेदवारांसाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवण्याची ऑनलाईन प्रणाली पुणे महानगरपालिकेमार्फत कार्यान्वित करण्यात आली आहे.
मागील निवडणुकांमध्ये NOC मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणे तसेच विविध खात्यांकडून प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही अडचण दूर करण्यासाठी पुणे महापालिकेने थकबाकी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एकात्मिक ऑनलाईन यंत्रणा सुरू केली आहे.
या ऑनलाईन प्रणालीद्वारे पुणे महानगरपालिकेच्या एकूण ४१ खात्यांना जोडण्यात आले असून, उमेदवाराने एकदाच ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तो अर्ज सर्व संबंधित खात्यांना एकाच वेळी लिंक केला जाणार आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे विविध खात्यांत फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही.
उमेदवारांनी https://nocelection.pmc.gov.in
या संकेतस्थळावर जाऊन ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे.
२९ डिसेंबर २०२५ पर्यंत प्राप्त होणाऱ्या अर्जांची प्राधान्याने पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
मात्र, ३० डिसेंबर २०२५ रोजी प्राप्त होणारे अर्ज विलंबाने दाखल झाल्याने, संबंधित खात्यांकडून जर वेळेत ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही, तर त्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदारांचीच राहील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
महापालिकेच्या या नव्या ऑनलाईन उपक्रमामुळे उमेदवारांचा वेळ वाचणार असून, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती येणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.