पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देणारा खासदार क्रीडा महोत्सव’ – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला खासदार क्रीडा महोत्सव हा केवळ स्पर्धात्मक उपक्रम नसून तरुणाईमध्ये आरोग्य, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण रुजवणारी एक प्रभावी चळवळ आहे. पुणे हे समृद्ध क्रीडा संस्कृतीचे केंद्र असून केंद्र व राज्य सरकार तसेच ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम दिला जाईल, असे प्रतिपादन खासदार व केंद्रीय सहकार आणि हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील खेळाडूंशी व्हर्च्युअली संवाद साधला. या संवादात खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासह पुण्यातील विजेते खेळाडू ऑनलाइन सहभागी झाले होते. यावेळी मोहोळ यांनी पुण्यात उपस्थित खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला पुणे खासदार क्रीडा महोत्सवाचे मुख्य समन्वयक मनोज एरंडे, पॅरा ऑलिम्पियन संदीप सरगर, राष्ट्रीय जलतरणपटू त्विषा दीक्षित, दिव्यांग खेळाडू प्रतीक घोलप यांच्यासह पुण्यातील ३५० हून अधिक विजेते खेळाडू ऑनलाइन सहभागी झाले होते.

मोहोळ पुढे म्हणाले, ‘गावागावातील तसेच वाड्या-वस्त्यांमधील सुप्त क्रीडा कौशल्यांना व्यासपीठ मिळवून देणारा हा उपक्रम ‘खेलो इंडिया’च्या संकल्पनेला बळ देणारा आहे. सक्षम, सुदृढ आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी क्रीडा संस्कृती रुजवणे अत्यंत महत्त्वाचे असून हा महोत्सव त्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.’

यावर्षी पुणे शहरातील ४६ हजारांहून अधिक खेळाडूंनी खासदार क्रीडा महोत्सवात सहभाग नोंदवला. पुण्याची क्रीडा संस्कृती जतन व संवर्धन करण्यासाठी हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जाईल, अशी ग्वाहीही मोहोळ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button