
पुणे: सध्याच्या काळातील पाणी व हवेच्या प्रदूषणासारख्या गंभीर समस्यांवर अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रभावी उपाय शक्य असल्याचे सिद्ध करणारे प्रात्यक्षिक ‘इको आईस’च्या वतीने पुण्यातील बोट क्लब येथे आज सादर करण्यात आले. पुण्यातील संशोधक आणि ‘इको आईस’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. करण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे प्रात्यक्षिक पार पडले.यावेळी प्रोजेक्ट ड्रॉपलेट आणि जलशुद्धी या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.
प्रोजेक्ट ड्रॉपलेट अंतर्गत सौर ऊर्जा व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने बोटीचा वापर करून नदी व अन्य जलस्त्रोतांतील पाण्याची शुद्धता, प्रदूषणाचे प्रमाण तसेच पर्यावरणीय घटकांचे परीक्षण केले जाते. पाण्यातील परिसंस्थेची संपूर्ण माहिती तात्काळ डॅशबोर्डवर उपलब्ध होते. फ्लुईड अॅनालिटिक्सच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पाला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून २०२४ चे ‘को-प्रोन्युअर ऑफ द इयर’ हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.यासोबतच पाण्यातील दूषित घटक नष्ट करून आरओ तंत्रज्ञानाच्या आधारे पाणी पिण्यायोग्य बनवणाऱ्या जलशुद्धी या यंत्रणेचेही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
घरगुती वापरापासून ते मोठ्या जलसाठ्यांपर्यंत ही यंत्रणा प्रभावीपणे वापरता येऊ शकते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य असून पाणीटंचाईवर मात करता येईल, असा विश्वास डॉ. चव्हाण यांनी व्यक्त केला. याशिवाय ड्रोनच्या माध्यमातून हवा शुद्ध करण्याचे तंत्रज्ञानही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमात विद्या प्रतिष्ठानच्या संचालक रजनी इंदुलकर, अतुल चंद्र, श्रुती बापट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रजनी इंदुलकर म्हणाल्या की, शुद्ध पाणी, प्रदूषित हवा आणि अनियंत्रित कचरा या आजच्या काळातील गंभीर समस्या असून, हवा व पाणी शुद्ध करण्यासाठी संशोधन करून तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या तरुणांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा संशोधनाला समाजातून प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.