भीमाशंकर मंदिर तीन महिने दर्शनासाठी बंद; महाशिवरात्रीला मात्र खुले – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे, दि. २७ : श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियोजनबद्ध कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी दर्शनाकरिता तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानने घेतला आहे. मात्र महाशिवरात्रीच्या १२ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मंदिर भाविकांसाठी खुले राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.

राज्य शासनाने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. या आराखड्यातील महत्त्वाच्या टप्प्यांची अंमलबजावणी करताना बांधकाम काळातील सुरक्षितता लक्षात घेऊन २३ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन, देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार व भीमाशंकर ग्रामस्थांच्या संयुक्त बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.सन २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक पायाभूत सुविधा, सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे मंदिर परिसर भाविकांसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या सूचनानित्य पूजा सुरू राहणार: मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी नित्य पूजाअर्चा, अभिषेक व धार्मिक विधी नियोजित वेळेत सुरू राहतील.थेट दर्शन बंद: या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष दर्शन सेवा उपलब्ध राहणार नाही.प्रवेशावर निर्बंध: बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी व भीमाशंकर ग्रामस्थ वगळता इतरांना परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले की,“श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास दीर्घकालीन सुरक्षितता व भाविकांच्या सोयीसाठी अत्यावश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button