उत्तर भारतातील थंड वाऱ्यांचा महाराष्ट्रावर प्रभाव; नाशिक-धुळे-जळगावसह मराठवाड्यात थंडीचा कडाका, शेतीवर परिणाम

पुणे | दि. २७ : उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे. विशेषतः नाशिक, धुळे, जळगाव, परभणी, धाराशिव (उस्मानाबाद) आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये बोचरी थंडी जाणवत आहे. काही ठिकाणी किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने नागरिकांना पहाटे आणि रात्री अधिक थंडीचा सामना करावा लागत आहे.

दिवसा उन्हामुळे थोडा उकाडा जाणवत असला तरी, पहाटे व रात्रीच्या वेळी गार वाऱ्यांसह धुके पडत असल्याने थंडीची तीव्रता अधिक वाढली आहे. अनेक ग्रामीण भागांमध्ये गारठ्याची स्थिती निर्माण झाली असून जनजीवनावर त्याचा परिणाम होत आहे.

या थंडीचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कांदा, हरभरा, भाजीपाला यांसारख्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असून शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यात थंडीमुळे जनावरे चारा कमी खात असल्याच्या तक्रारी असून त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर दिसून येत आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही थंडीची लाट सध्या कायम राहण्याची शक्यता असून जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर टिकून राहण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी तसेच शेतकऱ्यांनी पिके आणि जनावरांसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button