
पुणे दि. 27 : पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही दिवस उरले असतानाही प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. मात्र पुण्यात भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात युती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, पुढील काही तासांत युती आणि जागावाटपाचा अधिकृत फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
युतीच्या जागावाटपावरून काहीसा तिढा निर्माण झाल्याचे चित्र होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळायला हव्यात, अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यानंतर भाजप व शिवसेना नेत्यांमध्ये सलग बैठका आणि चर्चा सुरू झाल्या.
भाजपचे उमेदवार ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शहरातील सर्व प्रमुख नेत्यांची मॅरेथॉन बैठक पार पडली. यानंतर पुण्याची जबाबदारी असलेले उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुण्यातील युतीबाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, पुणे भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री उदय सामंत आणि स्वतःचा फोटो पोस्ट केल्याने राजकीय चर्चांना वेग आला. या भेटीत पुण्यातील संभाव्य भाजप–शिवसेना युतीला मूर्त स्वरूप देण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.
गुरुवारी दुपारी आमदार नीलम गोऱ्हे यांची भेट घेतल्यानंतर गणेश बिडकर मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर पुण्यासाठी भाजप–शिवसेना युतीबाबतची अंतिम चर्चा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. युतीचा नेमका फॉर्म्युला आणि कोणत्या जागांवर कोणता पक्ष निवडणूक लढवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील 62 उमेदवारांची पहिली यादी तयार करण्यात आली असून ती शुक्रवारी रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. मागील महापालिका निवडणुकीत भाजपने जिंकलेल्या 99 जागांपैकी 62 जागांसाठी ही पहिली यादी असणार असल्याची माहिती आहे.