महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील हालचालींना वेग : अमोल कोल्हे–रोहित पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांशी गुप्त बैठक

पुणे दि. 26 : पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिका निवडणुका २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये हालचालींना वेग आला आहे. डिसेंबर २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते अजित पवार यांची पुण्यातील ‘जिजाई’ निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या बैठकीत प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र लढावे का, याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. दोन्ही गट एकत्र आल्यास स्थानिक पातळीवर फायदा होऊ शकतो, असे मत बैठकीदरम्यान मांडण्यात आले.

बैठकीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील संभाव्य जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरही सविस्तर खलबतं झाली. काही प्रभागांवर दोन्ही गटांनी आपापले दावे मांडले असून, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना ही केवळ प्राथमिक चर्चा असल्याचे स्पष्ट केले. “सध्या कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. पुढील राजकीय घडामोडींवर ‘वेट अँड वॉच’ भूमिका ठेवण्यात आली आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२५ रोजी मतदान प्रक्रिया पार पडण्याची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी काळात या चर्चांना कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button