
पुणे दि 26 : : अभिनयासोबतच नृत्याची आवड जोपासत अभिनेत्री-नृत्यांगना संस्कृती बालगुडे हिने तिच्या पहिल्यावहिल्या डान्स ड्रामा ‘संभवामि युगे युगे’ चा आंतरराष्ट्रीय स्तरावर दणक्यात शुभारंभ केला आहे. दुबई येथे पार पडलेल्या या शोला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून टाळ्या-शिट्ट्यांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले.
काही दिवसांपूर्वी या डान्स ड्रामाची संकल्पना साकारत संस्कृतीने ‘संभवामि युगे युगे’ची सुरुवात केली. विशेष बाब म्हणजे या शोचा पहिलाच प्रयोग थेट परदेशात जाऊन हाऊसफुल्ल ठरला. भारतीय संस्कृती, भक्ती आणि नृत्य यांचा सुरेख संगम असलेल्या या प्रयोगाला दुबईतील रसिकांनी भरभरून दाद दिली.
या यशाबद्दल बोलताना संस्कृती बालगुडे म्हणाली,
“परदेशात जाऊन ‘संभवामि युगे युगे’चा पहिला शो करायचा ठरवला तेव्हा मनात खूप धाकधूक आणि उत्सुकता होती. भारताबाहेर या संकल्पनेला कसा प्रतिसाद मिळेल, अशी शंका होती. पण कृष्णरूपात माझी स्टेजवर एंट्री होताच प्रेक्षकांच्या टाळ्यांनी आत्मविश्वास वाढवला. शो संपल्यानंतर मिळालेलं स्टॅनडिंग ओव्हेशन आमच्यासाठी अविस्मरणीय ठरलं.”
शो संपल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. “हा शो हिंदीतही सादर करा”, “साक्षात कृष्ण अनुभवता आला” अशा प्रतिक्रिया रसिकांनी दिल्या. परदेशात मराठमोळ्या कृष्णरूपातील या डान्स ड्रामाला मिळालेलं प्रेम पाहून समाधान वाटत असल्याचं संस्कृतीने सांगितलं.
कृष्णाच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंग नृत्याच्या माध्यमातून उलगडणारा ‘संभवामि युगे युगे’ हा डान्स ड्रामा आता नव्या वर्षात भारतात सादर होणार आहे. पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये या शोचे प्रयोग होणार असून पुण्यात लवकरच प्रेक्षकांना हा नवा कोरा अनुभव घेता येणार आहे. येत्या काळात विविध कलाकृतींमधून संस्कृती बालगुडे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार यात शंका नाही.