ओबीसी आरक्षणाचा भंग : पुण्यातील साकुर्डे ग्रामपंचायत निवडणुकीत जात बनावट प्रकरण, उमेदवाराचे पद रद्द करण्याची मागणी

पुणे, दि. 26 : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील साकुर्डे ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा गंभीर भंग झाल्याचा आरोप करण्यात आला असून, बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवून विजयी झालेल्या उमेदवाराचे पद रद्द करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

२०२२–२०२६ या कालावधीसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसी (कुणबी) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर संबंधित उमेदवाराने नामनिर्देशन दाखल केले होते. मात्र, निवडणुकीदरम्यान तसेच नंतरही वैध जात प्रमाणपत्र सादर करण्यात आले नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. नियमानुसार सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवारी आपोआप रद्द होणे अपेक्षित असतानाही, निवडणूक अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणात जात पडताळणी समितीने संबंधित उमेदवाराचा ओबीसी दावा फेटाळला असतानाही जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडून जागा रिक्त घोषित करण्यात आलेली नाही किंवा पुनर्निवडणुकीचे आदेश देण्यात आलेले नाहीत. याबाबत वारंवार निवेदने, तक्रारी व प्रत्यक्ष भेटी घेऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

तक्रारदारांच्या मते, या प्रकरणात केवळ निकाल लावण्यात आला असून न्याय मिळालेला नाही. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असून, लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या मूलभूत तत्त्वांना धक्का बसत आहे. त्यामुळे दोषींवर फौजदारी कारवाई, निवडणूक अवैध घोषित करणे आणि राज्यस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात पत्रकार परिषदेत तक्रारदार श्री. सतीश अण्णा भोंगडे आणि ओबीसी कार्यकर्ते श्री. प्रणाल डोळे-पाटील यांनी माहिती दिली. कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button