भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन उत्साहात साजरा होणार; २० लाख अनुयायांचे नियोजन

पुणे : १ जानेवारी २०२६ रोजी मौजे पेरणे येथे होणारा २०९ वा भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा होणार आहे. यासाठी सुमारे २० लाख भीम अनुयायांच्या आगमनाचे नियोजन करण्यात आले असून, जिल्हा प्रशासनाने सर्व पायाभूत सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने व्यापक तयारी सुरू केली आहे. जास्तीत जास्त आंबेडकरी अनुयायांनी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले आहे.

अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी पिण्याचे पाणी, पार्किंग, शौचालये यांसह सर्व सुविधा यंदा मागील वर्षांपेक्षा अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. माननीय पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमवेत समाजबांधव व समन्वय समितीच्या सहापेक्षा अधिक बैठका पार पडल्या असून, नागरिकांकडून आलेल्या सूचनांच्या आधारे अंतिम नियोजन करण्यात आले आहे. यंदाचे नियोजन अधिक दर्जेदार व सुविधायुक्त राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुरक्षेच्या दृष्टीने यंदा विशेष खबरदारी घेण्यात आली असून, समाजकंटक व चोरट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पहिल्यांदाच ड्रोनद्वारे फेस स्कॅनिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यासोबतच पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस दलामार्फत १३ हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. नागरिकांची सुरक्षितता आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवंदनेचे शताब्दी वर्ष

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभाला भेट दिल्याच्या घटनेला पुढील वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त यंदाचे वर्ष मानवंदनेचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असून, त्याची सुरुवात १ जानेवारीपासून होणार आहे. यावेळी बाबासाहेबांसोबत विजयस्तंभावर अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांच्या कुटुंबीयांचे संयुक्त अभिवादन करण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

महार रेजिमेंटची मानवंदना

१९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महार रेजिमेंटची स्थापना करण्याची मागणी केली होती. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही महार रेजिमेंटचे निवृत्त सैनिक शौर्यस्तंभाला लष्करी मानवंदना देणार आहेत. यशसिद्धी आजी-माजी सैनिक फाउंडेशनच्या वतीने सुमारे ३ हजार निवृत्त सैनिक राष्ट्रगीताद्वारे मानवंदना देणार आहेत.

मान्यवरांची उपस्थिती

दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मान्यवर अभिवादनासाठी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, वामन मेश्राम, सुरेश माने, विवेक चव्हाण, खासदार चंद्रशेखर आझाद, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.

या वेळी समन्वय समितीच्या वतीने सुमारे एक लाख अनुयायांच्या भोजनाची व्यवस्था, अभिवादन सभा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राहुल डंबाळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button