
पुणे दि. 26 : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची असलेली पुणे म्हाडाची घरांची सोडत (Lottery) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे (Model Code of Conduct) हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या सोडतीअंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील एकूण ४,१८६ घरांचा समावेश आहे. मात्र, आचारसंहिता लागू असल्याने या कालावधीत सोडत काढण्यावर कायदेशीर निर्बंध येतात. त्यामुळे सध्या ही सोडत घेणे शक्य नसल्याचे म्हाडा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
याआधी ही सोडत डिसेंबर २०२५ च्या मध्यात घेण्याचे नियोजन होते. मात्र, तांत्रिक अडथळे तसेच अर्जांची छाननी सुरू असल्यामुळे त्यावेळीही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यानंतर आता आचारसंहिता लागू झाल्याने सोडत पुन्हा लांबणीवर पडली आहे.
या घरांसाठी सुमारे २.१५ लाख अर्जदारांनी अर्ज केले असून, त्यांच्याकडून जवळपास ४४६ कोटी रुपयांची अनामत रक्कम (EMD) जमा करण्यात आली आहे. त्यामुळे सोडतीकडे सर्व अर्जदारांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, म्हाडाकडून अद्याप नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच फेब्रुवारी २०२५ मध्ये सोडत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतचा अधिकृत निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे म्हाडा प्रशासनाने संकेत दिले आहेत.