
पुणे, दि.26 : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे महानगरचे अध्यक्ष विलास लेले, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य ॲड. तुषार झेंडे, सदस्या ॲड. अनिता गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी सांगितले की, ग्राहकांची फसवणूक टाळणे, त्यांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करणे तसेच फसवणूक झाल्यास उपलब्ध असलेल्या ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांचा नागरिकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे महानगरचे अध्यक्ष विलास लेले यांनी ग्राहकांचे हक्क आणि हित जपण्यासाठी सर्वांनी सजग राहण्याची गरज असल्याचे नमूद केले. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीमार्फत मोफत सल्ला सेवा उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य ॲड. तुषार झेंडे यांनी सांगितले की, यावर्षीच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाची संकल्पना ‘जलद, सुलभ डिजिटल न्यायाकडे वाटचाल’ अशी आहे. ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 हा नागरिकाभिमुख असून त्याची व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास 1915 हेल्पलाइन, 8800001995 चॅटबॉट किंवा e-jagriti.gov.in या संकेतस्थळावर तक्रार दाखल करता येते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी विविध विभागांच्या स्टॉल्सना भेट देत सेवा व वस्तुंबाबत माहिती घेतली.