वडगाव शेरीत शिवसेना (शिंदे गट) किमान दोन जागा द्याव्यात – उद्धव गलांडे यांची मागणी

पुणे दि. 26 : वडगाव शेरी प्रभाग क्रमांक पाचमध्ये शिवसेनेने अनेक वर्षे प्रभावी प्रतिनिधित्व केले असून, या भागात शिवसेना (शिंदे गट)ची संघटनात्मक ताकद भक्कम आहे. त्यामुळे आगामी पुणे महापालिका निवडणुकीत वडगाव शेरीतील प्रभागांमध्ये शिवसेना शिंदे गटाला किमान दोन जागा द्याव्यात, अशी ठाम मागणी शिवसेना पुणे शहर उपशहर संघटक उद्धव गलांडे यांनी केली.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिवसेना युती असली, तरी जागावाटपात शिवसेना शिंदे गटाला कमी जागा मिळण्याची शक्यता असल्याच्या चर्चांमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वडगाव शेरीतील शिवसेना (शिंदे गट)च्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी मांडण्यात आली.

या पत्रकार परिषदेला छाया रविंद्र गलांडे, रमेश साळुंके, चेतन गलांडे, शाहरुख कुरेशी, विपुल दळवी, विकास गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उद्धव गलांडे म्हणाले,
“लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपसोबत खांद्याला खांदा लावून काम केले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपातही शिवसेना शिंदे गटाला समान संधी मिळाली पाहिजे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिकरित्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. ग्रामपंचायत, नगरसेवक ते महापालिकेपर्यंत शिवसेनेचे प्रतिनिधित्व सातत्याने राहिले आहे.”

ते पुढे म्हणाले की,
“येरवडा येथे शिवसेनेचे तीन नगरसेवक होते. तसेच खराडी, लोहगाव आणि वाघोली भागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद मजबूत आहे. त्यामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील सहा प्रभागांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी जागा देण्यात याव्यात.”

वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष हेमंत बत्ते यांनी सांगितले,
“वडगाव शेरी मतदारसंघात शिवसेना घराघरात पोहोचली आहे. कार्यकर्त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी येथे शिवसेनेने निवडणूक लढवणे आवश्यक आहे. त्यामुळे युतीत शिवसेनेला योग्य जागा मिळाल्याच पाहिजेत.”

पुणे शहर समन्वयक शंकर संगम म्हणाले,
“वडगाव शेरीत निष्ठावान शिवसैनिक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात किमान दोन जागा शिवसेनेला मिळाव्यात, अशी आमची ठाम अपेक्षा आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button