महापालिका निवडणुकीत ‘ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याला मतदान टाळा’ मोहीम; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा भाजपलाच इशारा

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शहरातील राजकीय वातावरण तापले असून, ‘ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याला मतदान टाळा’ अशी मोहीम हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून उघडपणे राबवली जात आहे. हिंदुत्वाची उपेक्षा करणाऱ्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना पुण्यातील हिंदुत्ववादी समाज जागा दाखवेल, असा थेट इशारा समस्त हिंदू आघाडीच्या वतीने आयोजित हिंदुत्व जागृती सभेत देण्यात आला.

शिवाजीनगर येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये झालेल्या या सभेत हभप संग्रामबापू भंडारे, क्रांतिकारी देशभक्त समीर कुलकर्णी आणि मिलिंदभाऊ एकबोटे यांनी मार्गदर्शन केले. महापालिका निवडणुकीत अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणासाठी हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्या पक्षांवर आणि विशेषतः भाजपमधील काही नेत्यांवर वक्त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. दहशतवादमुक्त, शांत आणि सुरक्षित पुण्यासाठी भाजपची उमेदवार यादी ‘मुस्लिममुक्त’ असावी, अशी मागणीही या सभेत करण्यात आली.

मिलिंद एकबोटे यांनी पुण्यात हिंदुत्वाची उपेक्षा सुरू असल्याचा आरोप करत, “हिंदू बांधवांवर हल्ले करणाऱ्या प्रवृत्तींना उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे असेच चालू राहिले, तर भाजपचीही अवस्था भविष्यात काँग्रेससारखी दयनीय होईल,” असा इशारा दिला. हिंदुत्वाच्या जीवावर सत्तेत आलेल्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केल्यास त्यांना निवडणुकीत उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हभप संग्रामबापू भंडारे यांनी हिंदू समाजाच्या सहिष्णूतेचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप केला. “हिंदुत्वावर सातत्याने आघात होत असताना शांत बसणे परवडणारे नाही. प्रत्येक हिंदूने जागृत होऊन राजकीय पक्षांना जाब विचारला पाहिजे,” असे ते म्हणाले. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायाकडेही त्यांनी लक्ष वेधले.

समीर कुलकर्णी यांनी हिंदुत्वाची ताकद एकवटण्याचे आवाहन करत, “हिंदुत्वाशी पंगा घेणाऱ्यांचे राजकीय अस्तित्व टिकत नाही, हे काँग्रेसच्या आजच्या परिस्थितीवरून स्पष्ट होते,” असा टोला लगावला. हिंदू मतदारांच्या ताकदीमुळे सत्ता मिळते, याचा विसर सत्ताधाऱ्यांनी पडू देऊ नये, असेही त्यांनी सांगितले.

या सभेला सकल हिंदू समाजाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत ‘ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याला मतदान टाळा’ हा संकल्प अमलात आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button