२४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव१५ ते २२ जानेवारी दरम्यान संपन्न होणार

पुणे दि. 25 : पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) २०२६ हा १५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. ही माहिती पिफचे संचालक व ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर, सबिना संघवी, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व निवड समिती अध्यक्ष समर नखाते, सदस्य अभिजीत रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे व अदिती अक्कलकोटकर उपस्थित होते.

हा महोत्सव पीव्हीआर पॅव्हिलियन मॉल (६ स्क्रीन), ई-स्क्वेअर युनिव्हर्सिटी रोड (३ स्क्रीन) आणि एनएफडीसी-एनएफआय, लॉ कॉलेज रोड (१ स्क्रीन) अशा एकूण १० स्क्रीनमध्ये पार पडणार आहे.
महोत्सवासाठी कॅटलॉग फी ८०० रुपये असून, ऑनलाईन नोंदणी www.piffindia.com या संकेतस्थळावर सुरू झाली आहे. स्पॉट रजिस्ट्रेशन ५ जानेवारीपासून सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व थिएटर्समध्ये उपलब्ध असेल.

यंदाच्या महोत्सवाची थीम ‘महान दिग्दर्शक, अभिनेते व चित्रपट निर्माते गुरुदत्त यांची जन्मशताब्दी’ अशी आहे. जागतिक व मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग तसेच ग्लोबल सिनेमा विभागात मिळून सुमारे १४० चित्रपट प्रेक्षकांसाठी सादर केले जाणार आहेत.

महोत्सवाची सुरुवात ‘ला ग्राझिया’ (इटली) या पावलो सोरेंटीनो दिग्दर्शित चित्रपटाने होणार असून, समारोप ‘फादर मदर सिस्टर ब्रदर’ या जीम जारमुश दिग्दर्शित चित्रपटाने होणार आहे.

जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागासाठी १०३ देशांमधून ९०० हून अधिक चित्रपट आले होते. त्यातून १४ चित्रपटांची अंतिम निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय परीक्षकांमार्फत परीक्षण होणार असून, सर्वोत्कृष्ट चित्रपटास ‘महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ (₹१० लाख) देण्यात येणार आहे.

यंदा निवड झालेल्या १४ जागतिक चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली असून, विविध देशांतील उत्कृष्ट कलाकृती पुणेकर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button