महापालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांच्या एनओसीसाठी पिळवणूक; पुणे महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप

पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) साठी महापालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना अनुसूचित जाती पुणे शहरप्रमुख मिलिंद अहिरे यांनी केला आहे.

महापालिकेच्या एनओसीसाठी गेल्या काही दिवसांपासून सर्व पक्षीय इच्छुक उमेदवारांना प्रचंड धावपळ करावी लागत असून, प्रशासनाकडून मनमानी व मुस्कटदाबी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मिलिंद अहिरे हे एनओसीसाठी ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात गेले असता, त्यांना महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका बसल्याचे निदर्शनास आले. अहिरे यांचा जाहिरात फलक हा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत व जागेत असताना देखील, संबंधित फलकावर पुणे महापालिकेने बेकायदेशीररित्या कर व दंड (बोजा) आकारल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

“कॅन्टोन्मेंटच्या जागेवरील फलकावर महापालिकेचा कोणताही अधिकार नसताना देखील आमच्यावर अन्यायकारक कारवाई करण्यात आली आहे. ही सरळ सरळ इच्छुक उमेदवारांची अडवणूक असून राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे,” असे मिलिंद अहिरे यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी तातडीने न्याय न मिळाल्यास पुणे महापालिकेच्या विरोधात जाहीर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या घटनेमुळे महापालिका निवडणुकीपूर्वी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button