
नवनवीन विषय, वेगळा आशय आणि प्रेक्षकांच्या बदलत्या आवडी लक्षात घेत झी स्टुडिओज मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नावीन्यपूर्ण प्रयोग सादर करत आहे. सामाजिक आशयघन कथा, भावनिक कौटुंबिक चित्रपटांपासून ते मनोरंजनप्रधान सिनेमांपर्यंतचा प्रवास केल्यानंतर आता झी स्टुडिओज प्रेक्षकांसाठी एक स्टायलिश आणि रुबाबदार लव्हस्टोरी घेऊन येत आहे. ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा धडाकेबाज टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून पहिल्याच झलकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
टीझरमधील ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ ही टॅगलाईन प्रेमकथेतील हटकेपणा आणि आत्मविश्वास अधोरेखित करते. ‘रुबाब’ ही केवळ गोडगुलाबी प्रेमकहाणी नसून, प्रेमासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असलेल्या, स्वतःचे नियम स्वतः ठरवणाऱ्या रुबाबदार नायकाची कथा आहे. डॅशिंग अंदाज, स्वॅग आणि भावनांचा योग्य समतोल साधत ही प्रेमकहाणी आजच्या तरुणाईशी नक्कीच जोडली जाणारी आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात,
“ ‘रुबाब’ हा स्वतःचा ठाम आवाज असलेल्या तरुणाईची कथा आहे. आजच्या पिढीचं प्रेम प्रामाणिक असतं, पण त्यात एक स्वॅग असतो. तोच रुबाब या चित्रपटातून दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जनावलेकर सांगतात,
“मराठी प्रेक्षकांना नेहमीच फ्रेश आणि स्टायलिश आशय हवा असतो. ‘रुबाब’ ही आजच्या तरुणाईच्या अॅटिट्यूडशी जोडलेली दमदार प्रेमकहाणी आहे. हा चित्रपट केवळ रोमँटिक नाही, तर प्रेमासाठी उभं राहण्याची, स्वतःच्या तत्वांवर जगण्याची आणि भावना निर्भीडपणे व्यक्त करण्याची गोष्ट आहे.”
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले आहे. संजय झणकर आणि गौरी झणकर निर्माते असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जनावलेकर प्रस्तुतकर्ते आहेत. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.
‘रुबाब’ ६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.