भीमा कोरेगाव शौर्यदिनासाठी कडक बंदोबस्त; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची विजयस्तंभ परिसराची पाहणी

पुणे : १ जानेवारी २०२६ रोजी मौजे पेरणे येथे होणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज पुणे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी विजयस्तंभ परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक श्री. निखिल गुप्ता यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

शौर्यदिनासाठी राज्यासह देशभरातून लक्षावधी अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, गर्दी नियंत्रण, आपत्कालीन व्यवस्थापन आदी बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. आयोजक तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधत संभाव्य अडचणी व त्यावरील उपाययोजनांचा आढावा पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला.

यावेळी बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, “यंदाचा शौर्यदिन उत्सव शांततेत, निर्विघ्न आणि कोणत्याही तणावाविना पार पडेल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता १ जानेवारी रोजी शांततेत अभिवादनासाठी यावे.”

या पाहणीदरम्यान पुणे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, संदीप भाजीभीकरे, हिंमताराव जाधव यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button