
पुणे दि. 24 : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरलेला ‘लग्नाचा शॉट’ या आगामी चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, या पोस्टरमधून चित्रपटातील प्रमुख कलाकारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर ही नवी, फ्रेश जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
आतापर्यंत केवळ शीर्षक आणि संकल्पनेमुळे उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘लग्नाचा शॉट’ने आता आपल्या रंगीबेरंगी, आशयपूर्ण पोस्टरद्वारे थेट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पोस्टरमध्ये पारंपरिक लग्नाच्या वेशभूषेत उभी असलेली नायक-नायिकेची जोडी दिसते. दोघांच्याही चेहऱ्यावर गोंधळलेले, प्रश्नार्थक भाव असून डोक्याला बंदुकीसारखी बोटं लावलेली देहबोली पाहता, लग्नाच्या धामधुमीत काहीतरी मोठा घोळ होणार असल्याचे संकेत मिळतात.
पोस्टरच्या पार्श्वभूमीत रेल्वे, बस, वळणावळणाचे रस्ते आणि राशीचक्र यांसारखे दृश्यात्मक घटक वापरण्यात आले असून, ‘लग्नाअगोदरही लग्नानंतरही’ असे सूचक शब्द लक्ष वेधून घेतात. प्रवास, वेळेचा गोंधळ, चुकीचे निर्णय आणि नशिबाचे खेळ यांचा कथेशी असलेला संबंध पोस्टरमधून अधोरेखित होतो. संपूर्ण पोस्टर उत्साही, हलकाफुलका आणि विनोदी वातावरण तयार करत असून चित्रपटाचा मनोरंजक सूर स्पष्ट करतो.
चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणतात,
“‘लग्नाचा शॉट’ ही लग्नाच्या गोंधळाकडे मजेशीर नजरेने पाहणारी गोष्ट आहे. कोणताही गंभीर संदेश देण्याचा अट्टहास न ठेवता, संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहू शकेल असा निव्वळ मनोरंजनाचा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हलकंफुलकं, स्वच्छ आणि प्रामाणिक मनोरंजन हेच या चित्रपटाचं खरं बलस्थान आहे.”
महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म्स यांच्या सहयोगाने साकारलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत-संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली असून, अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
हा मनोरंजक मराठी चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.