‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ मधील दमदार ‘हाकामारी’ गाणे प्रदर्शित

मराठी शाळा, मातृभाषा आणि तिच्या अस्मितेसाठी सुरू असलेल्या संघर्षाला ताकद देणारे हेमंत ढोमे दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ सध्या चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रेरणादायी ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चित्रपटातील संघर्ष अधिक तीव्र करणारे ‘हाकामारी’ हे दमदार आणि तुफान गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

हे गाणे पुण्यातील डेक्कन चौक येथे मध्यरात्री बारा वाजता एका वेगळ्या आणि प्रभावी पद्धतीने लॉंच करण्यात आले. यावेळी काही महिलांनी या गाण्यावर जोरदार नृत्य सादर केले. कपाळावर लाल टिळा, मोकळे केस आणि भयावह लूकमधील या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

मराठी शाळा टिकवण्यासाठी, मातृभाषेच्या अस्मितेसाठी आणि अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या लढ्याचं प्रतीक असलेले ‘हाकामारी’ हे गाणे संघर्ष आणि परिवर्तनाची हाक देणारे आहे. गाण्यातील प्रत्येक ठेका आणि प्रत्येक शब्द मराठी माणसाच्या मनात लढण्याची ऊर्जा निर्माण करतो.

या गाण्याला हर्ष – विजय यांचे दमदार संगीत लाभले असून, महाराष्ट्रभर गाजलेल्या ‘द फोल्क आख्यान’ या कार्यक्रमातील लोकप्रिय गायिका अनुजा देवरे हिचा कणखर आवाज लाभला आहे. तर या गाण्याचे धारदार आणि प्रभावी शब्द ईश्वर अंधारे यांनी लिहिले आहेत.

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात,
“‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट मराठी शाळा आणि मातृभाषेच्या अस्तित्वासाठी दिल्या जाणाऱ्या लढ्याची गोष्ट मनोरंजक पद्धतीने सांगतो. ट्रेलरमधून संघर्षाची झलक दिली आणि ‘हाकामारी’ या गाण्यातून त्या संघर्षाला थेट आवाज दिला आहे. आज अनेक मराठी शाळा टिकण्यासाठी झगडत आहेत. हा लढा केवळ चित्रपटापुरता नसून तो आपल्या सगळ्यांचा लढा आहे.”

या चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, निर्मिती सावंत आणि मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले असून, क्षिती जोग या चित्रपटाच्या निर्माती आहेत. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button