महिलांच्या आरोग्य जनजागृतीसाठी महिला क्रिकेट स्पर्धा संपन्न; २०,५०० सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप

पुणे : महिलांच्या आरोग्याविषयी व्यापक जनजागृती घडवून आणण्यासोबतच ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब व गरजू मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली वुमन्स चॅरिटी क्रिकेट लीग स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमांतर्गत जमा झालेल्या सुमारे २० हजार ५०० सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप राज्यभरातील गरजू महिला व मुलींना करण्यात येणार आहे.

ही स्पर्धा कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने संगिता ताई तिवारी यांच्या बिटिया फाउंडेशनच्या सहयोगाने तसेच संकेत शिंदे यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेदरम्यान खेळाडू व प्रेक्षकांना सॅनिटरी नॅपकिन्स आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे महानगरपालिकेच्या टीमनेही या उपक्रमासाठी सॅनिटरी नॅपकिन्सची मदत केली.

खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेत पोलीस, वकील, सनदी लेखापाल, महापालिका कर्मचारी, मॉडेल्स, सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार अशा विविध क्षेत्रातील महिलांचे एकूण नऊ संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेत बिटिया फाउंडेशन गुलाबो गँग संघाने विजेतेपद पटकावले, तर SGC चार्टर्ड चॅम्पियन्स (CA) संघ उपविजेता ठरला. विशेष खेळाडू पुरस्काराने रुपाली पाटील ठोंबरे यांना सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेचे मुख्य आयोजक ‘पुण्याचे पॅडमॅन’ योगेश पवार होते. तर उद्योजक कृष्णकुमार गोयल, सूर्यादत्त ग्रुपचे डॉ. संजय चोरडिया, संकेत शिंदे, डॉ. महेश थोरवे, स्वाती झुंगरे, राज रणदिवे, समिता ताई गोरे व संगिता तिवारी यांनी संघमालक म्हणून जबाबदारी सांभाळली.

यावेळी मिलिंद जोशीराव, सीए डॉ. केतन जोगळेकर, सारिका जोगळेकर, संग्राम पवार, सचिन भैया धिवार, गौरव लखानी, सूरज ढोपे, हुसैन चेचडवला, तेजपाल वाघ, गौरवराज, ऋषिकेश बालगुडे, चेतन चावडा, केतन धावडे, किरण कामठे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्मिता मधुकर, निलेश वावरे, पौर्णिमा लुणावत, नील राठोड, रुणाल जगताप, मयूर घाग, शुभम, ओंकार जाधव व संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे छायाचित्रण संकेत कुलकर्णी व अजय कांबळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button