
पुणे : महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपली विचारधारा बाजूला ठेवून सामान्य माणसाचा अपेक्षाभंग केला आहे. आज कोण नेता कुणासोबत आहे, हे ओळखणे कठीण झाले असून राज्यात भ्रष्टाचाराने परिसीमा गाठली आहे. निवडणूक जिंकल्यानंतर अनेक नगरसेवक कोट्यधीश होत असल्याचे चित्र दिसत आहे. या सत्तालोभी राजकारणाला आम आदमी पार्टी (आप) शह देईल, असा ठाम विश्वास आपचे प्रभारी व दिल्लीचे माजी आमदार प्रकाश जरवाल यांनी व्यक्त केला.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, विकासाची गंगा सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा, दवाखाने, वाहतूक आणि रोजगार क्षेत्राचे सक्षमीकरण करणे हे आम आदमी पार्टीचे प्रमुख धोरण आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये आप सरकारने जे सकारात्मक बदल घडवून आणले, तेच विकास मॉडेल महाराष्ट्रात राबवण्याचा आमचा संकल्प आहे.
आम आदमी पार्टी आगामी नगरपरिषद व महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार असून जास्तीत जास्त जागा लढवण्याचा प्रयत्न राहील, असेही जरवाल यांनी स्पष्ट केले. पक्षाकडे प्रामाणिक व इमानदार कार्यकर्ते असल्यामुळे अनेक नगरपालिकांमध्ये उमेदवार यादी आधीच जाहीर करून आघाडी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
आपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंग, माजी मुख्यमंत्री अतिशी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राखी बिडलान हे महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीत नेवासा येथे आपच्या उमेदवार शालिनीताई सुखधान विजयी झाल्या असून महाराष्ट्रात पक्षाने खाते उघडले आहे, असे आपचे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी सांगितले.
यावेळी आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहर अध्यक्ष धनंजय बेनकर, सुदर्शन जगदाळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.