३० लाखांहून अधिक पुस्तकांची विक्री, ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल; पुणे पुस्तक महोत्सवाला साडेबारा लाख नागरिकांची विक्रमी उपस्थिती

पुणे : पुणे पुस्तक महोत्सव २०२५ मध्ये साडेबारा लाख नागरिकांनी भेट देत ३० लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी केली असून, यातून ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुस्तक विक्री आणि वाचकांची संख्या दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. महोत्सवात सहभागी झालेल्या नागरिकांपैकी ६० टक्क्यांहून अधिक तरुण असल्याने युवकांमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यात हा महोत्सव यशस्वी ठरला आहे. पुणे पुस्तक महोत्सव आता केवळ पुण्यापुरता न राहता महाराष्ट्राचा महोत्सव बनला आहे, अशी माहिती मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने १३ ते २१ डिसेंबरदरम्यान आयोजित पुणे पुस्तक महोत्सव २०२५ ची सांगता रविवारी झाली. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत पांडे बोलत होते. यावेळी संयोजन समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. संजय चाकणे, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. आनंद काटीकर आदी उपस्थित होते.

राजेश पांडे म्हणाले, मोबाईल व गॅजेट्सच्या युगात नागरिक आणि विशेषतः तरुण वर्ग मोठ्या संख्येने पुस्तकांकडे वळल्याचे सकारात्मक चित्र या महोत्सवात दिसून आले. लेखकांशी संवाद, स्वाक्षरीसाठी लागलेल्या रांगा आणि विविध साहित्यिक उपक्रम हे पुण्याच्या समृद्ध वाचन संस्कृतीचे प्रतीक ठरले. गेल्या वर्षी सुमारे २५ लाख पुस्तकांची खरेदी होऊन ४४ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती, तर यंदा हा आकडा वाढून ३० लाखांहून अधिक पुस्तके आणि ५० कोटींच्या पुढे उलाढाल झाली आहे. यंदा महोत्सवात तीन विश्वविक्रम प्रस्थापित होऊन त्यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचेही त्यांनी सांगितले.

बागेश्री मंठाळकर यांनी सांगितले की, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य आणि ग्रंथपालांचा सहभाग यंदा विशेष ठळक होता. २०० हून अधिक ग्रंथपाल सहभागी झालेल्या ग्रंथपाल संमेलनात मोठ्या प्रमाणावर ग्रंथालयांसाठी पुस्तके खरेदी करण्यात आली.
प्रसेनजीत फडणवीस यांनी वाचक मेळावा आणि विविध साहित्यिक कार्यक्रमांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.
प्रा. डॉ. संजय चाकणे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, जिल्हा व पोलीस प्रशासन तसेच विविध संस्थांच्या सहकार्यामुळे महोत्सव यशस्वी झाल्याचे नमूद केले.

दरम्यान, पुढील वर्षी पुणे पुस्तक महोत्सव १२ ते २० डिसेंबर २०२६ या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असून, तो अधिक भव्य व नावीन्यपूर्ण करण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती राजेश पांडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button