पुण्यात उबाठाला मोठे खिंडार; पृथ्वीराज सुतार, संजय- अश्विनी भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला असून माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि अश्विनी भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

‘भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचा हिंदुत्ववादी विचार जपत, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारताच्या स्वप्नासाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पासाठी पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत आहे. भाजपमध्ये कुणालाही सावत्र वागणूक मिळत नाही, तर सख्ख्या भावासारखा सन्मान मिळतो,’ असे मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मोहोळ पुढे म्हणाले, ‘केंद्र, राज्य आणि पुणे महापालिकेत भाजपच्या ट्रिपल इंजिन सरकारमुळे विकासकामांना गती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुण्यात मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. या विकासाच्या आणि हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित होऊन या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.’

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, ‘मी पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले यांच्यासोबत सभागृहात काम केले आहे. आमचा हिंदुत्वाचा धागा कायम आहे. आगामी पुणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत.’

पक्षप्रवेशानंतर पृथ्वीराज सुतार म्हणाले, ‘भाजप-शिवसेना युती हिंदुत्वाच्या विचारावर झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर देशाला एकत्र आणले आहे. जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश करताना अभिमान वाटतो.’

तर संजय भोसले म्हणाले, ‘आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळत होतो. मात्र काँग्रेसने तो पाळला नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारधारा जपणाऱ्या भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.’

या पक्षप्रवेशामुळे पुण्यात शिवसेना (उबाठा) गटाला मोठे खिंडार पडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button