
पुणे : शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पुण्यातील युवानेते वैभव वाघ यांची शिवसेनेच्या प्रभारी ‘निवडणूक राज्य समन्वयक’ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाच्या ‘राज्य कक्ष प्रमुख’ पदाची महत्त्वाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीचे अधिकृत पत्र पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेली ही नियुक्ती शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काम करणाऱ्या आणि संघटनात्मक ताकद असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या याच धोरणानुसार वैभव वाघ यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
वंदेमातरम संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष, हाडाचे गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते, निवडणूक रणनीतीकार तसेच ‘व्हायरल माणुसकी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक म्हणून वैभव वाघ यांची ओळख आहे. त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचा आणि निवडणूक व्यवस्थापनातील अनुभवाचा लाभ शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये होणार आहे.
या नियुक्तीनुसार वैभव वाघ यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी आणि सोलापूर या सहा महानगरपालिकांसाठी समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कार्यरत असलेला धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष हा उपक्रम सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत असून, या कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू जनतेला थेट मदत मिळत आहे.
या नियुक्तीबाबत वैभव वाघ यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, नैसर्गिक व राष्ट्रीय आपत्तीच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः घटनास्थळी जाऊन काम करताना पाहिले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन काही महिन्यांपूर्वी सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून मदत करण्याची संधी या माध्यमातून मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.