
पुणे, दि. 24 : नागरिकांनी आता ठरवायचे आहे की त्यांना घाणीत, अविकसित शहरात राहायचे आहे की विकासाच्या दिशेने जाणारे शहर हवे आहे. जर घाणीत राहायचे असेल तर कमळाला मतदान करा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीला साथ देऊन आमच्या हाती सत्ता द्या, असे थेट आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
मंगळवारी सकाळी अकोला येथील यशवंत भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली.
अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शहरात महिलांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. नागरिकांवर अन्यायकारक करांचा मोठा बोजा टाकण्यात आला आहे. भाजप सत्तेने करांच्या माध्यमातून नागरिकांची लूट केली असून ही लूट थांबवली पाहिजे. यासंदर्भात दिवंगत नगरसेविका धनश्री देव यांनी याचिका दाखल केली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडीचा महापौर असताना शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र आज लोकसंख्या वाढूनही पाणी आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. दगडपरवा धरणातील पाणी अकोला शहरासाठी आरक्षित करण्याचा निर्णय होणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
शहरातील डम्पिंगचा प्रश्न गंभीर असून किमान चार डम्पिंग ग्राउंड उभारणे आवश्यक आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे ‘सोने’ असून त्यातून रोजगार व उत्पन्ननिर्मिती शक्य आहे; मात्र भाजप सत्तेने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला.
शॉप अॅक्टच्या भाडेवाढीबाबत बोलताना ते म्हणाले की, वंचित सत्तेत असताना कोणतीही भाडेवाढ करण्यात आली नव्हती. भाजपनेच व्यापारी व नागरिकांवर हा बोजा टाकला. रेल्वे उड्डाणपुलाचे काम वर्षानुवर्षे रखडले असून दिलेली आश्वासने कागदावरच राहिली आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
अकोल्यातील वाढते तापमान चिंताजनक असून ते कमी करण्यासाठी मोरणा नदीवर बंधारा उभारण्यासह विविध पर्यावरणपूरक उपाययोजना राबविण्याचा पक्षाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खुले नाट्यगृह उभारण्याचाही विचार असल्याचे त्यांनी नमूद केले.
उबाठा, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीबाबत चर्चा सुरू असून स्थानिक वंचित नेते अंतिम निर्णय घेतील. २९ तारखेला यासंदर्भात अंतिम निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पत्रकार परिषदेला शहर संघटक निलेश देव, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, बालमुकुंद भिरड, सचिव मिलिंद इंगळे, संतोष रहाटे, गजानन गवई, पराग गवई, वंदना वासनिक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.