सहभागी प्रत्येक विद्यार्थी हा विजेताच – राष्ट्रीय कला उत्सव २०२५ चा जल्लोषपूर्ण समारोप : संजय कुमार

पुणे, दि. 23 : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कलेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले असून त्या अनुषंगाने आयोजित राष्ट्रीय कला उत्सव २०२५ प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे. काही विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाली असली, तरी या उत्सवात सहभागी झालेला प्रत्येक विद्यार्थी विजेताच आहे, असे गौरवोद्गार भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे सचिव श्री. संजय कुमार यांनी काढले.

ते राष्ट्रीय कला उत्सव २०२५ च्या समारोप सोहळ्यात बोलत होते. कलेला प्राधान्य देणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमासाठी त्यांनी महाराष्ट्र शासन, एनसीईआरटी आणि यशदा यांचे अभिनंदन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये कल्पकतेने शिकण्याची सवय विकसित होईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव श्री. आनंदराव पाटील, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. रनजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त श्री. सचिंद्र प्रताप सिंह, एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी, एससीईआरटीचे संचालक श्री. राहुल रेखावार, एनसीईआरटीच्या विभाग प्रमुख प्रा. ज्योत्स्ना तिवारी तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘एकमेकांच्या कला-संस्कृतीची देवाणघेवाण म्हणजेच खरा ‘एक भारत श्रेष्ठ भारत’’ असे नमूद करत, विद्यार्थ्यांची कला जागतिक स्तरावर पोहोचेल, असा विश्वास श्री. आनंदराव पाटील यांनी व्यक्त केला.
दिल्लीबाहेर पहिल्यांदाच हा कला उत्सव इतक्या व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात आल्याचा उल्लेख करत, हा उत्सव विद्यार्थ्यांसाठी जागतिक व्यासपीठ ठरेल, असे श्री. रनजीतसिंह देओल यांनी सांगितले.

कला ही आपल्या संस्कृतीचा आत्मा असून या कलाकार विद्यार्थ्यांचा एनसीईआरटीसोबत आजीवन संबंध निर्माण व्हावा, अशी अपेक्षा दिनेश प्रसाद सकलानी यांनी व्यक्त केली.
यावेळी संगीत गायन (समूह), संगीत वादन, तालवाद्यांसह विविध १२ कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

शर्वरी बॅनर्जी यांनी कला उत्सवातील विविध सादरीकरणांची माहिती दिली. उत्सवाचा संपूर्ण आढावा घेणारी माहितीपट चित्रफीतही यावेळी सादर करण्यात आली.

राष्ट्रीय कला उत्सव २०२५ हा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या समन्वयाने आणि श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी यांच्या सहकार्याने दि. २० ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. देशभरातील विद्यार्थ्यांनी या उत्सवात सहभाग घेत कलेच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाणघेवाण केली.

समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन स्वरूपा बने व प्रिया मोर यांनी केले, तर आभार प्रियंवदा तिवारी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button