वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ड्रोन (रिमोट) पायलट प्रशिक्षण; DGCA मान्यताप्राप्त प्रमाणित कोर्सेस उपलब्ध

पुणे, दि. 23 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था ही भारतीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) मान्यताप्राप्त संस्था असून, कुशल व प्रमाणित ड्रोन पायलट घडविण्यासाठी येथे आधुनिक पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमात वर्ग प्रशिक्षण, सिम्युलेटर आधारित प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष ड्रोन फ्लायिंग सत्रांचा समावेश आहे. संस्थेमार्फत लघु श्रेणी रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स (७ दिवस), मध्यम श्रेणी रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स (७ दिवस) तसेच लघु व मध्यम श्रेणी संयुक्त रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स (१० दिवस) उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या कोर्ससाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असून उमेदवारांचे वय १८ ते ६५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे वैध वैद्यकीय प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

प्रवेशासाठी चार पासपोर्ट आकाराचे फोटो (पांढऱ्या पार्श्वभूमीसह), दहावीची मूळ गुणपत्रिका व प्रमाणपत्र, आधार कार्ड, एक अतिरिक्त ओळखपत्र (पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशन कार्ड), वरील सर्व कागदपत्रांच्या स्वयंघोषित प्रती तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे संपर्क साधावा. पात्र माजी सैनिकांनी दूरध्वनी क्रमांक +९१ ७५५०००३७०५ किंवा ई-मेल vnmkv.rpto@gmail.com
वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button