
पुणे, दि. २२ : जिल्ह्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच ग्रामीण भागातील उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये १८ डिसेंबर २०२५ रोजी अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला.पुणे महानगरपालिकेअंतर्गत शिक्षण हक्क मंचचे संस्थापक अध्यक्ष मतीनभाई मुजावर यांच्या पुढाकाराने माध्यमिक शिक्षण विभागातील उर्दू माध्यमाच्या सर्व शाळांना एकत्र करून हा उपक्रम राबविण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत डॉ. अल्लामा इकबाल उर्दू प्राथमिक शाळा, कासारवाडी; आला हजरत इमाम अहमद रजा उर्दू प्राथमिक शाळा, नेहरूनगर; उर्दू प्राथमिक शाळा, खराळवाडी; जाधववाडी, चिखली येथे तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा उरुळी कांचन, राजगुरुनगर व मंचर येथे अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये अल्पसंख्याक हक्क, समानता, सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्ये याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने शाळांमध्ये वक्तृत्व, निबंध लेखन, चित्रकला, भित्तीपत्र स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विजेत्या विद्यार्थ्यांना चषक (ट्रॉफी) व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पुणे महानगरपालिकेअंतर्गत आयोजित कार्यक्रमात चांदभाई बळबड्डी यांनी अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करत अल्पसंख्याकांचे हक्क, कर्तव्ये व सामाजिक जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, शिक्षण हक्क मंचचे मतीनभाई मुजावर तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील उर्दू विभागाच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.