३१ डिसेंबरपर्यंत पॅन-आधार लिंक नाही केल्यास पॅन होणार निष्क्रिय; ₹१००० दंड भरावा लागणार

पुणे, दि. २३ : जर तुम्ही ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड १ जानेवारी २०२६ पासून निष्क्रिय (Inactive) होणार आहे. निष्क्रिय पॅन पुन्हा सक्रिय करण्यासाठी करदात्यांना ₹१००० दंड भरावा लागणार असून हा दंड आयकर विभागाच्या e-Pay Tax सुविधेमार्फत भरल्यानंतरच पॅन-आधार लिंक प्रक्रिया पूर्ण होईल.

पॅन निष्क्रिय झाल्यास कर भरणे, आयकर रिटर्न दाखल करणे, आयकर परतावा (Refund) मिळवणे, बँक व्यवहार, नवीन बँक खाते उघडणे तसेच विविध आर्थिक गुंतवणूक व्यवहारांमध्ये मोठ्या अडचणी येऊ शकतात. तसेच, आधारशी लिंक नसलेल्या पॅनवर २० टक्के TDS कापला जाण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट आर्थिक फटका बसू शकतो.

काय होईल?

पॅन कार्ड निष्क्रिय होणार : पॅनचा कोणत्याही आर्थिक किंवा करसंबंधी कामासाठी वापर करता येणार नाही.

आर्थिक व्यवहारांवर परिणाम : बँकिंग, गुंतवणूक, टॅक्स फाइलिंग, रिफंड या सर्व प्रक्रिया अडचणीत येतील.

जास्त TDS कपात : लिंक नसलेल्या पॅनवर २०% TDS आकारला जाऊ शकतो.

काय करावे?

वेळेत पॅन-आधार लिंक करा : ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी लिंक करणे अनिवार्य.

मुदत चुकल्यास दंड भरा : ₹१००० दंड भरल्यानंतरच पॅन पुन्हा सक्रिय होईल.

ऑनलाइन प्रक्रिया : आयकर विभागाच्या अधिकृत ई-फायलिंग पोर्टलवरून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करता येते.

करदात्यांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आजच आपले पॅन कार्ड आधारशी लिंक करून संभाव्य अडचणी टाळाव्यात, असे आवाहन आयकर विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button