
पुणे, दि. 23 : मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टीसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक रणजित पाटील (Ranjit Patil) यांचे वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी सोमवारी, २२ डिसेंबर २०२५ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील विक्रोळी येथील त्यांच्या राहत्या घरी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तातडीने उपचार मिळण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी कला विश्वावर शोककळा पसरली आहे.
रणजित पाटील हे सध्या रंगभूमीवर प्रचंड गाजत असलेल्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचे दिग्दर्शक होते. या नाटकात प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या प्रमुख भूमिका असून प्रेक्षकांकडून नाटकाला भरभरून प्रतिसाद मिळत होता.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या रणजित पाटील यांनी अभिनयासोबतच अनेक नाटके, दूरदर्शन मालिका आणि एकांकिकांचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्या सर्जनशीलतेमुळे आणि संवेदनशील दिग्दर्शनशैलीमुळे त्यांनी अल्पावधीतच कलाविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीने एक गुणी कलाकार आणि संवेदनशील दिग्दर्शक गमावला असून, कलाकार, चाहते आणि सहकाऱ्यांकडून सोशल मीडियावर तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.