
पुणे दि. 22 : केदार शिंदे दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ आपल्या हटके नावामुळे आणि धमाकेदार टीझरमुळे आधीपासूनच चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे बहुचर्चित शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, सासू-सुनेच्या नात्यातील टोमणे, नोकझोक, मस्ती आणि आपुलकीचा खुसखुशीत रंग या गाण्यातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
घराघरांत घडणाऱ्या मिश्किल संवादांचे संगीतमय रूप म्हणजे हे गाणे. सासू-सुनेच्या रोजच्या आयुष्यातील गंमतीदार प्रसंग, खट्याळ तक्रारी आणि त्या मागील प्रेम या साऱ्यांचे सुरेख चित्रण यात पाहायला मिळते. त्यामुळे हे गीत केवळ ऐकायलाच नव्हे, तर पाहायलाही तितकेच मजेदार ठरते.
या टायटल ट्रॅकला वैशाली सामंत आणि प्रियांका बर्वे यांचा दमदार आवाज लाभला असून, त्यांच्या गायकीमुळे गाण्यातील नोकझोक अधिक जिवंत होते. कुणाल–करण यांचे संगीत हे गाण्याचे खास आकर्षण ठरते. पारंपरिक मराठी ढंग आणि आधुनिक ठेका यांचा सुरेख मिलाफ त्यांनी साधला आहे. गीतलेखन वलय मुलगुंड यांचे असून, साधे-सोपे आणि लक्षात राहणारे शब्द गाण्याला अधिक खुसखुशीत बनवतात.
गाण्यात निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे पारंपरिक नऊवारी साडीत दिसत असून, त्यांची केमिस्ट्री आणि सहज अभिनय गाण्याच्या मस्तीला अधिक उठाव देतो. एकूणच हे शीर्षक गीत चित्रपटाचा विनोदी आणि कौटुंबिक मूड सुरुवातीलाच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरते.
गाण्याबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात,
“सासू-सुनेचे नाते हे कायमच रंजक आणि भावनिक असते. या गाण्यात आम्ही त्या नात्याची खट्याळ बाजू मजेशीर पद्धतीने मांडली आहे. प्रत्येक मंगळागौर कार्यक्रमात हे गाणे वाजेल, याची मला खात्री आहे.”
झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित या चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर आणि सना शिंदे यांनी केली आहे. कथा व संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांचे असून, पटकथा वैशाली नाईक यांची आहे. छायाचित्रण व संकलन मयूर हरदास यांनी केले आहे.
हा धमाल कौटुंबिक विनोदी चित्रपट १६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.