
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) उमेदवारांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.
आज सकाळी बारामती येथील शासकीय विश्रामगृहात अजित पवार आणि रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे तसेच पक्षाचे प्रतिनिधी यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी अल्पसंख्याक, दलित व आंबेडकरी समुदायासाठी राबवलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी राहुल डंबाळे यांनी सांगितले की, सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर अजित पवार यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा पाठिंबा देण्यात येत आहे. तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील आगामी विकास योजनांच्या अंमलबजावणीत समाजोपयोगी विषय मार्गी लावण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याने पक्ष समाधान व्यक्त करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेसला या पाठिंब्याचा लाभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.