
पुणे दि. 22 : पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अनेक ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी काही महत्त्वाच्या नगरपरिषदांमध्ये सत्ता राखण्यात यश मिळवले आहे.
बारामती नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ४१ पैकी ३५ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. इंदापूर, जेजुरी, लोणावळा, फुरसुंगी-उरुळी देवाची, शिरूर या नगरपरिषदांमध्येही राष्ट्रवादीने बहुमत मिळवत नगराध्यक्षपदावर दावा मजबूत केला आहे.
आळंदी, सासवड आणि तळेगाव दाभाडे येथे भाजपने नगराध्यक्षपद पटकावत आपली ताकद दाखवली. विशेषतः आळंदी नगरपरिषदेत भाजपने २१ पैकी १५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे.तर चाकण, जुन्नर, राजगुरूनगर आणि मंचर येथे शिवसेनेने नगराध्यक्षपद मिळवत महत्त्वाची आघाडी घेतली आहे.
माळेगाव बुद्रुक, वडगाव, दौंड येथे अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांची भूमिका निर्णायक ठरली असून काही ठिकाणी सत्तास्थापनेसाठी युती-आघाडीचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.एकूणच पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निकालांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व ठळकपणे दिसून येत असले तरी भाजप व शिवसेनाही प्रभावी ठरल्या आहेत. आगामी काळात स्थानिक राजकारणात सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.