
पुणे दि 22 : सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना आज, २२ डिसेंबर २०२५ रोजी मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयने कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती (Stay on Conviction) दिल्याने त्यांची आमदारकी वाचली आहे. या निर्णयामुळे त्यांच्यावर टांगती तलवार असलेली अपात्रतेची शक्यता दूर झाली आहे.
१९९५ मधील मुख्यमंत्री कोट्यातील घर घोटाळा प्रकरणात फसवणूक व बनावट कागदपत्रांच्या आरोपाखाली नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निकालाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयने १८ डिसेंबर रोजी त्यांना जामीन मंजूर करून शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती; मात्र Conviction ला स्थगिती देण्यास नकार दिल्याने आमदारकी धोक्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी करताना आज न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली. परिणामी, आमदारकी कायम राहणार असून कोकाटे यांना कायदेशीर व राजकीयदृष्ट्या मोठे बळ मिळाले आहे.
दरम्यान, सत्र न्यायालयाच्या निकालानंतर निर्माण झालेल्या कायदेशीर गुंतागुंतीमुळे कोकाटे यांनी १८ डिसेंबर २०२५ रोजी आपल्या कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आजच्या निर्णयामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत नवी शक्यता निर्माण झाली आहे.