राष्ट्रीय कला उत्सवाला जल्लोषात सुरुवात; पुण्यात देशभरातील ८०० हून अधिक विद्यार्थी सहभागी

पुणे, दि. २० : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकराव्या राष्ट्रीय कला उत्सवाचा उद्घाटन सोहळा पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे उत्साहात पार पडला. देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर कलारसाने भारावून गेला.
उद्घाटनप्रसंगी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार, तसेच एनसीईआरटीच्या विभाग प्रमुख प्रा. ज्योत्स्ना तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आनंदराव पाटील म्हणाले की, “भारतीय कला व संस्कृतीतील वैविध्यामुळेच देश प्रगल्भ झाला आहे. विकसित भारताच्या स्वप्नात कला क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.”तर “स्पर्धेपेक्षा कला-संवाद अधिक महत्त्वाचा असून प्रत्येक विद्यार्थी इथून काहीतरी नवे घेऊन जाणार आहे,” असे मत प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी व्यक्त केले.

शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी विद्यार्थ्यांना मेहनत व सहभागाचा मूलमंत्र दिला. एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कलेला दिलेल्या महत्त्वावर प्रकाश टाकला.“पुणे हे शिक्षण, कला आणि भक्तीचे केंद्र असल्याने येथे हा उत्सव होणे विशेष आहे,” असे प्रा. ज्योत्स्ना तिवारी यांनी नमूद केले. गेल्या दहा वर्षांत या उत्सवात देशातील विविध राज्यांतील ७३१८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून, यंदा आसाम, लक्षद्वीपसह देशभरातून ८०० हून अधिक विद्यार्थी पुण्यात दाखल झाले आहेत.

उद्घाटनानंतर प्रतिभा ज्युनियर कॉलेज, पिंपरी यांचे महाराष्ट्राची कलासंस्कृती दर्शवणारे दमदार नृत्य सादरीकरण झाले. विशेष विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे सांकेतिक भाषांतर करण्यात आले. सूत्रसंचालन मधू जयस्वाल व विकास कोकाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार यांनी केले.हा राष्ट्रीय कला उत्सव दि. २० ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी यांच्या सहकार्याने यशदा, पुणे येथे होत असून, भारत सरकारच्या ई-विद्या चॅनल क्रमांक ३३ वर या उत्सवाचे थेट प्रक्षेपण सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button