मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; २१ डिसेंबरला सकाळी १० वाजता निकाल प्रक्रिया सुरू – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. २० : राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतींसाठी २ व २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून, २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याची माहिती जितेंद्र डुडी यांनी दिली.

मतमोजणीसाठी राखीव कर्मचाऱ्यांसह एकूण ९१४ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निकालाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात असून, आवश्यक त्या प्रतिबंधात्मक आदेशांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. सर्व मतमोजणी केंद्रांवर आवश्यक साहित्य व व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या असून, कर्मचारी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधींना प्रवेशिका देण्यात आल्या आहेत. माध्यमांसाठी स्वतंत्र माध्यम कक्ष उभारण्यात आला असून, फेरीनिहाय निकाल तातडीने उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणी प्रक्रिया अचूक व पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी काटेकोर नियोजन व रंगीत तालीम घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button