
पुणे दि. 21 : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आक्रमक खेळी करत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या रणनीतीखाली आज तब्बल २२ तगड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मधील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक प्रभागांतील राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
भाजपने पुणे महापालिका निवडणुकीची संपूर्ण धुरा मोहोळ–बिडकर या जोडीकडे सोपवली असून, यंदा १२५ नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार पक्षाने जाहीर केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होण्यापूर्वीच झालेल्या या इनकमिंगमुळे युती–आघाड्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रमुख नेते
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, सचिन दोडके, माजी नगरसेवक बाळासाहेब धनकवडे; तसेच अजित पवार गटातील सायली रमेश वांजळे, नारायण गलांडे, रोहिणी चिमटे, खंडू सतीश लोंढे, पायल विलास तुपे, प्रतिभा चोरगे, संतोष मते, प्रशांत तुपे, विराज तुपे, इंदिरा तुपे, विकास नाना दांगट, कणव वसंतराव चव्हाण, अमोल देवडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील मुळशी येथील भानुदास पानसरे, गणेश पानसरे, कृष्णकुमार पानसरे, किरण साठे, सचिन पानसरे यांचाही समावेश आहे.
प्रवेशप्रसंगी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा एक परिवार आहे. तुम्ही आज या परिवाराचा भाग झाला आहात. तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही.”
केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वेगवान विकास सुरू असून, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात चंद्रकांत पाटील आणि गणेश बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी काम झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.