
पुणे दि. 20 : : महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणारी पुणेकरांची उत्सवपरंपरा असलेली भीमथडी जत्रा आजपासून पुण्यातील सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू झाली आहे. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फाउंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या जत्रेचे उद्घाटन खासदार सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्षे, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी जयश्री निकम, दीप्ती पवार, सुरेखा शिंदे, अश्विनी ननावरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी आयोजक सुनंदाताई पवार, रजनीताई इंदुलकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. दिगांबर दुर्गाडे, प्राचार्य डॉ. माने, निलेश नलावडे, सुनील चांदेरे, अरुण देसाई आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. 40 हून अधिक ढोलवादकांनी ढोल-ताशांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत केले.
‘देशी फुले’ – यंदाची खास थीम
यंदा भीमथडी जत्रेची थीम देशी फुले अशी असून मुघल गार्डनच्या धर्तीवर साकारलेल्या मांडणीत 30 हून अधिक देशी फुलांची रोपे पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. बारमासी मोगरा, मोती मोगरा, कुंद, जुई, बोगणवेल, जास्वंद, कण्हेर, रातराणी, झेंडू, गुलाब, पारिजात, सोनचाफा, कृष्णकमळ, काश्मिरी गुलाब यांसह विविध फुलरोपे येथे पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, आमदार रोहित पवार आणि सकाळ उद्योग समूहचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी जत्रेला भेट दिली.
सोयी-सुविधा
ऑनलाईन तिकीट बुकिंग सुविधा
प्रशस्त पार्किंग व परतीसाठी स्वतंत्र रस्ता
ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर
‘नो प्लास्टिक झोन’
शेतकरी दालन, भीमथडी सिलेक्ट, स्वयंसिद्धा दालन
कला-संस्कृती, आकर्षक रांगोळ्या व खाद्यपदार्थांची मेजवानी
ही जत्रा पाळीव प्राणी, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठीही अनुकूल असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.पुढील 5 दिवसांसाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग www.bhimthadijatra.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.