माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांचे निधन; महाराष्ट्राने कणखर महिला नेतृत्व गमावले

सातारा दि21 : महाराष्ट्राच्या माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेत्या डॉ. शालिनीताई पाटील यांचे शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी निधन झाले. मुंबईतील माहीम येथील त्यांच्या ‘ज्योती सदन’ या राहत्या घरी दुपारी ३:४८ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९४ वर्षांच्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजाराशी झुंज देत होत्या.

डॉ. शालिनीताई पाटील या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत. १९८० च्या दशकात त्यांनी काँग्रेस सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले. तसेच त्यांनी सांगलीच्या खासदार म्हणून आणि सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघाच्या आमदार म्हणूनही प्रभावी प्रतिनिधित्व केले.

आर्थिक निकषांवरील आरक्षणाच्या त्या कट्टर समर्थक होत्या. या भूमिकेसाठी त्यांनी स्वतःचा ‘क्रांतिसेना’ हा पक्ष स्थापन करत स्पष्टवक्तेपणा आणि ठाम भूमिका यांची ओळख निर्माण केली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक न्याय, ग्रामीण विकास आणि दुर्बल घटकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला.त्यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. शरद पवार, अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी “महाराष्ट्राने कणखर, निर्भीड आणि स्पष्टवक्ती महिला नेतृत्व गमावले,” अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
डॉ. शालिनीताई पाटील यांच्या पार्थिवावर साताऱ्यातील कोरेगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button