पुण्यात १९ वी भीमथडी जत्रा सज्ज : २० ते २५ डिसेंबरदरम्यान रंगणार ग्रामीण महोत्सव

पुणे दि.20 : महिलांच्या बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणारी भीमथडी जत्रा यंदा १९ व्या वर्षात पदार्पण करत असून दिनांक २० ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर (सिंचननगर), पुणे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे.

ही जत्रा अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फौंडेशन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.

जत्रेचे औपचारिक उद्घाटन सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्रातील बचत गटातील यशस्वी महिला उद्योजक व भीमथडी जत्रेच्या आयोजक मा. सुनंदाताई पवार यांच्या हस्ते होणार आहे. पुणेकरांसाठी सकाळी १० वाजल्यापासून जत्रेत प्रवेश खुला राहणार आहे.

यंदाच्या भीमथडी जत्रेत नेहमीच्या ग्रामीण उत्पादनांसोबतच टेरेस गार्डनिंग आणि मिलेट प्रोसेसिंगची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके पाहायला मिळणार आहेत. तसेच गव्हाचा व गाईचा चिक स्टॉलमध्येच ताज्या स्वरूपात तयार करून देण्यात येणार आहे.

या वर्षी ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध असल्याने तिकीटासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही. जत्रास्थळी ATM सुविधा, प्रशस्त पार्किंग, तसेच परतीच्या प्रवासासाठी स्वतंत्र रस्ता ही यंदाची वैशिष्ट्ये आहेत.

जेष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर सुविधा, संपूर्ण परिसर “नो प्लास्टिक झोन”, तसेच पाळीव प्राणी, लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांसाठी अनुकूल व्यवस्था करण्यात आली आहे. ग्राहकांनी कापडी पिशव्या सोबत आणाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पुणेकरांचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भीमथडी जत्रेला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
६ दिवसांचे ऑनलाईन तिकीट www.bhimthadijatra.com
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button