
पुणे, दि. १९ : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेला ‘राष्ट्रीय कला उत्सव २०२५’ यावर्षी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. शनिवार २० ते मंगळवार २३ डिसेंबर या कालावधीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे हा चारदिवसीय उत्सव रंगणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या समन्वयाने तसेच श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी यांच्या सहकार्याने हा उत्सव पार पडणार आहे. २० डिसेंबर रोजी उद्घाटनानंतर २२ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील विविध कला स्पर्धा होतील, तर २३ डिसेंबर रोजी समारोप व बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने एनसीईआरटी, नवी दिल्ली यांच्यातर्फे २०१५ पासून दरवर्षी या उत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाचा हा अकरावा राष्ट्रीय कला उत्सव आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार कलेला ज्ञानप्राप्तीचे प्रभावी माध्यम मानले गेले असून, या उत्सवातून विद्यार्थ्यांना नव्या शिक्षण धोरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
या महोत्सवात देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसह केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार आहेत. ४०५ मुले, ५१३ मुली असे एकूण ९१८ विद्यार्थी, १०८ शिक्षक आणि ३६ परीक्षक या उत्सवात सहभागी होऊन गायन, वादन, नृत्य, नाटक, दृश्यकला, पारंपरिक कथाकथन यांसह १२ विविध कला प्रकारांचे सादरीकरण करणार आहेत.
देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रतिभावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा राष्ट्रीय कला महोत्सव शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सहभागींना महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविण्यासह हा अनुभव संस्मरणीय ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या संचालक अनुराधा ओक यांनी व्यक्त केला आहे.