
पुणे, दि19 : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कलारंग’ या भव्य चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन रामकृष्ण कांबळे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत यांच्या हस्ते, बालगंधर्व कलादालन येथे उत्साहात पार पडले.
या प्रदर्शनात शाळेच्या आजी व माजी विद्यार्थ्यांनी साकारलेली ५०० हून अधिक चित्रे रसिकांसाठी मांडण्यात आली आहेत. विविध शैली, विषय आणि माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे दर्शन घडते. तसेच, शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या २५ व्यावसायिक चित्रकारांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन शाला समिती अध्यक्ष अमित कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुनिता राव आणि कलाशिक्षक हनुमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हे प्रदर्शन येत्या शनिवारपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.