
पुणे दि.18 : मराठी टेलिव्हिजनवरून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अक्षया नाईक आता थेट बॉलिवूडच्या भव्य प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. ‘सुंदरा’ ही भूमिका साकारत तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. वर्षाच्या शेवटी तिने चाहत्यांना खास आनंदाची बातमी दिली असून, ती आता एका मोठ्या हिंदी वेब सीरिजचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे.
नेटफ्लिक्सवर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या आगामी तस्करी या वेब सीरिजमध्ये अक्षया अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांसोबत दिसणार आहे. नुकताच या सीरिजचा टिझर प्रदर्शित झाला असून, त्यामध्ये ती बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता इम्रान हाश्मी याच्यासोबत एका दृश्यात झळकताना दिसतेय. पहिलीच वेब सीरिज आणि तीही इम्रान हाश्मीसारख्या मोठ्या कलाकारासोबत—अक्षयासाठी ही संधी खर्या अर्थाने जॅकपॉट ठरत आहे.
तस्करीमधील अनुभव शेअर करताना अक्षया म्हणते,
“इम्रान हाश्मी सरांसारख्या बड्या बॉलिवूड स्टारसोबत काम करण्याची भावना खूपच खास होती. आमचे फक्त दोन-तीन सीन होते, पण ते करतानाचं दडपण आणि आनंद दोन्ही शब्दात सांगणं कठीण आहे. पहिली वेब सीरिज आणि सहकलाकार म्हणून इम्रान सरांसोबत काम करण्याची संधी ही माझ्यासाठी सुवर्णसंधी आहे.”
फॅशन असो वा अभिनय—अक्षया नाईक नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री ठरली आहे. आगामी काळात ती आणखी नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्स आणि वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं संकेत मिळत आहेत. नेटफ्लिक्ससारख्या जागतिक प्लॅटफॉर्मवरील Netflix या प्रोजेक्टमुळे तिच्या करिअरला नवे परिमाण मिळणार, यात शंका नाही.