
नाशिक/मुंबई : नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आमदार आणि राज्याचे विद्यमान मंत्री माणिकराव कोकाटे यांना ३० वर्षे जुन्या ‘सदनिका घोटाळा’ प्रकरणात मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय (सुनील) कोकाटे यांची दोन वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा कायम ठेवली आहे.
दरम्यान, बुधवारी अटक वॉरंट जारी होण्याच्या हालचाली सुरू असतानाच माणिकराव कोकाटे मुंबईतील लीलावती रुग्णालय येथे दाखल झाले.
रुग्णालय सूत्रांनुसार, त्यांना उच्च रक्तदाब, श्वसनाचा त्रास व हृदयाशी संबंधित लक्षणे जाणवल्याने दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्वास घेण्यात अडचण असल्याने डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) निरीक्षणाखाली ठेवले आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी बुधवारी रात्री उशीरा आदेश जारी करून माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा व अल्पसंख्याक विकास ही दोन्ही खाती काढून घेतली आहेत. मात्र, मंत्रिपद कायम ठेवण्यात आले आहे.
न्यायालयीन निर्णयानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत चर्चा सुरू असून, अटक वॉरंट, अपील व उपचारांचा कालावधी यावर पुढील घडामोडी अवलंबून राहणार आहेत.