
अलिबाग : मराठी शाळांच्या अस्तित्वावर मनोरंजक आणि संवेदनशील भाष्य करणाऱ्या बहुप्रतिक्षित क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच एका अनोख्या आणि भावनिक वातावरणात प्रदर्शित झाला. अलिबागमधील नागाव येथील ज्या मराठी शाळेत चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते, त्याच शाळेच्या चौकात ट्रेलर अनावरणाचा सोहळा पार पडला. त्यामुळे शाळेच्या वर्गखोल्या, बाक, फळा आणि मैदान पुन्हा एकदा आठवणींचे साक्षीदार ठरले.
चित्रपटाची कथा बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या मराठी शाळेभोवती फिरते. अनेक वर्षांनंतर माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र येत आपल्या शाळेला वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. ट्रेलरमध्ये शालेय आयुष्यातील खोडकरपणा, मैत्री, शिक्षकांची शिस्त, दंगा-मस्ती आणि निरागस क्षण नॉस्टॅल्जिक शैलीत मांडले आहेत. आज मराठी शाळा बंद पडण्याच्या चर्चेत असताना, हा चित्रपट मनोरंजनाच्या माध्यमातून मराठी भाषा व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो.
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, “महाराष्ट्रात मराठी शाळांची संख्या कमी होत चालली आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर मजेशीर, भावनिक आणि वास्तवाशी जोडलेली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या शाळेत शूटिंग झाले, तिथेच ट्रेलर लाँच करणे हा आमच्यासाठी खास अनुभव होता.”
या चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट आहे. याशिवाय अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या भूमिकेबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.
चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाची निर्मिती क्षिती जोग यांनी केली असून, सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट १ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.