
पुणे : भारत आणि पाकिस्तानदरम्यान सन १९७१ मध्ये झालेल्या युद्धातील पाकिस्तानवरील विजय हा भारतीय लष्कराच्या इतिहासातील सोनेरी पान असल्याचे प्रतिपादन या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या अनुभवी वीरसैनिकांनी केले. विजय दिनानिमित्त लष्कराच्या दक्षिण मुख्यालय यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात दक्षिण मुख्यालयातील प्रमुख अधिकारी, १९७१ च्या युद्धात सहभाग घेतलेले निवृत्त अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांनी शहिदांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या युद्धातून बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली. भारतीय लष्कराच्या शौर्याबरोबरच अचूक सामरिक रणनीतीमुळे संपूर्ण जग स्तिमित झाले. या युद्धात पाकिस्तानचे तब्बल एक लाख सैनिकांनी शरणागती पत्करली. शरण आलेल्या शत्रू सैनिकांनाही भारतीय लष्कराने सन्मानाची वागणूक दिली, असे सन्माननीयांनी मनोगतातून नमूद केले.
कार्यक्रमानंतर सर्व युद्धविरांचा सत्कार लेफ्टनंट जनरल धीरज सेठ (आर्मी कमांडर – दक्षिण कमांड) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मा. कर्नल एन. एस. न्यायपती यांचा विशेष गौरव करण्यात आला. १९७१ च्या ऐतिहासिक युद्धात योगदान दिल्यानंतर निवृत्त झाल्यावर त्यांनी विश्रांती रुग्णालयाच्या माध्यमातून गेली ३२ वर्षे जनसामान्यांना अविरत वैद्यकीय सेवा दिली आहे. तसेच केअर इंडिया मेडिकल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना, विशेषतः कर्करोगावर केमोथेरपीसारखे उपचार मोफत उपलब्ध करून देत असल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.