
पुणे : भारतीय संस्कृतीचा पाया ज्ञानावर उभा असल्याने ती निरंतर आहे. भौतिकता व विज्ञानाकडे दुर्लक्ष न करता विविधतेचा सन्मान करून स्वीकारणे हीच भारतीय ज्ञानपरंपरेची खरी ओळख आहे. एकात्मता हा या परंपरेचा मुख्य बिंदू असून ज्ञानदृष्टी प्राप्त करण्यासाठी साहित्य अनिवार्य आहे, असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे पुणे पुस्तक महोत्सवअंतर्गत आयोजित पुणे लिट फेस्टचे उद्घाटन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये झाले. यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर उपस्थित होते.
अनेक संस्कृत श्लोक उद्धृत करत खान यांनी साहित्य व वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. साहित्याचा आस्वाद व सज्जनांचे सान्निध्य हा अमृतानुभव मानला जातो, असे त्यांनी नमूद केले. लहानपणापासून पुस्तकांची आवड असल्याचे सांगत त्यांनी तंत्रज्ञानाबाबत भीती न बाळगता त्याचा उपयोग ज्ञानप्रसारासाठी करावा, असे आवाहन केले. जितका ज्ञानाचा प्रसार होईल तितकी देशाची प्रगती होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ऋग्वेदाला युनेस्कोने सर्वांत प्राचीन मान्यता दिल्याचा उल्लेख करत त्यांनी भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेचा गौरव केला. भारतीय ग्रंथांचे अरबी अनुवाद आणि त्यातून युरोपातील वैज्ञानिक प्रगतीला मिळालेला आधार याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पुणे हे सांस्कृतिक व साहित्यिक चेतनेचे महत्त्वाचे केंद्र असल्याचे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक (गीतारहस्य), गोपाळ कृष्ण गोखले आणि महात्मा फुले यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
प्रा. मिलिंद मराठे म्हणाले, पुन्हा पुन्हा वाचले जाणारे साहित्य अभिजात ठरते. ज्ञान, मनोरंजन आणि समाजाला दिशा देण्याची ताकद साहित्यात असते. “वाचा, ऐका आणि भारत समजून घ्या” ही पुणे लिट फेस्टची संकल्पना आहे.
राजेश पांडे यांनी सांगितले की, गेल्या वर्षी २५ लाख प्रतींची विक्री झाली असून तरुण वाचकांची वाढती उपस्थिती या महोत्सवाने सिद्ध केली आहे. लहान मुलांसह सर्वांसाठी येथे काही ना काही आहे.