
पुणे : पुणे पुस्तक महोत्सव च्या पहिल्या दोन दिवसांत (शनिवार-रविवार) पुस्तक खरेदी-विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून, दीड लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी महोत्सवाला भेट दिली. युवक-युवतींचा सहभाग विशेष ठरला असून अनेक वाचकांनी एकाहून अधिक पुस्तके खरेदी केल्याचे चित्र आहे, अशी माहिती मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली.
राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) यांच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालय मैदानावर १३ ते २१ डिसेंबर दरम्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी सुमारे ७० हजारांहून अधिक नागरिकांची हजेरी लागली. परंपरेनुसार अशी गर्दी शेवटच्या दिवशी दिसते; मात्र यंदा पहिल्याच दिवसापासून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
राजेश पांडे म्हणाले की, दोन्ही मंडपांत मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच विविध विषयांवरील पुस्तकांच्या दालनांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. परदेशी नागरिकांचाही सहभाग दिसून आला. एनबीटीच्या १०% सवलतीसह नामवंत प्रकाशकांकडून मिळणाऱ्या अतिरिक्त सवलतींचा सकारात्मक परिणाम उलाढालीवर झाला आहे. कोणती पुस्तके अधिक विकली गेली, कोणत्या विषयांना जास्त पसंती मिळाली आणि एकूण उलाढाल याची सविस्तर माहिती महोत्सवाच्या शेवटी जाहीर केली जाणार आहे.
ग्रंथालये आणि महाविद्यालयांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी
पश्चिम महाराष्ट्रातील विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालये व ग्रंथालये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पुस्तके खरेदी करतात. पुणे मध्यवर्ती ठिकाण असल्याने सवलतीत खरेदी करणे परवडते. त्यामुळे या संस्थांकडून नव्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. लेखकांशी थेट संवाद, नव्या पुस्तकांची ओळख आणि साहित्यविश्वातील नवे ट्रेंड्स समजण्याचा लाभही या महोत्सवातून मिळत असल्याचे ग्रंथपालांचे मत आहे.